आंबेडाळ

सणाचे पदार्थ · वेळ: २० मिनिटे (+ ४ तास भिजवणे) · ५-६ जण

चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाची ओळख — भिजवलेल्या हरभरा डाळीची, कैरी किसून घातलेली, आंबट-तिखट-गोड कोरडी 'डाळ'. सोबत थंडगार पन्हं — चैत्राचा खरा मेनू!

साहित्य

  • हरभरा डाळ — १ वाटी
  • कैरी (कच्चा आंबा) — १ मध्यम
  • हिरव्या मिरच्या — २-३
  • आलं — छोटा तुकडा
  • ओलं खोबरं — पाव वाटी
  • कोथिंबीर — मूठभर
  • साखर — १ चमचा
  • मीठ — चवीनुसार
  • फोडणी: तेल २ चमचे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता

कृती

  1. हरभरा डाळ धुवून चार-पाच तास पाण्यात भिजत ठेवा.
  2. डाळ चाळणीत निथळून घ्या आणि मिरच्या, आलं घालून पाणी न घालता भरड वाटा — फार बारीक नाही.
  3. कैरीची साल काढून ती किसून घ्या. आंबटपणानुसार किती घालायची ते ठरवा.
  4. वाटलेल्या डाळीत किसलेली कैरी, खोबरं, साखर, मीठ आणि कोथिंबीर मिसळा.
  5. छोट्या कढईत तेल गरम करून मोहरी, हिंग, हळद आणि कढीपत्ता घालून फोडणी करा.
  6. ही फोडणी डाळीवर ओता आणि नीट मिसळा. लगेच वाढा.

टिपा

आंबेडाळ फोडणी घालून लगेच खावी — जास्त वेळ ठेवली तर कैरीमुळे पाणी सुटतं.

डाळ भरडच ठेवा — थोडी कुरकुरीत लागली पाहिजे.