गूळपोळी

सणाचे पदार्थ · वेळ: १ तास · १० पोळ्या

संक्रांतीची खास पोळी — तीळ, गूळ आणि बेसनाचं सारण भरून खुसखुशीत भाजलेली. थंडीत तुपासोबत खाल्ली की अंगात ऊब भरते.

साहित्य

  • सारण: किसलेला गूळ — दीड वाटी
  • भाजलेले तीळ (कुटलेले) — अर्धी वाटी
  • बेसन (तुपात भाजलेलं) — पाव वाटी
  • खसखस, वेलची पूड
  • पारी: कणीक — २ वाट्या, मैदा — अर्धी वाटी, कडकडीत तेलाचं मोहन — ३ चमचे, मीठ

कृती

  1. भाजलेलं बेसन, कुटलेले तीळ, खसखस आणि वेलची किसलेल्या गुळात घालून हाताने चांगलं मळून मऊ सारण करा.
  2. कणीक, मैदा, मीठ आणि गरम तेलाचं मोहन घालून घट्टसर पीठ भिजवा.
  3. पिठाच्या दोन छोट्या पुऱ्या लाटा. एकीवर सारणाचा गोळा पसरवून दुसरी पुरी ठेवा आणि कडा बंद करा.
  4. हलक्या हाताने पातळ पोळी लाटा.
  5. मंद आचेवर तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा. गूळ बाहेर येऊन जळू नये म्हणून आच मंदच ठेवा.
  6. थंड झाल्यावर गूळपोळी कुरकुरीत होते. तुपासोबत वाढा.

टिपा

गूळपोळी आठवडाभर टिकते — प्रवासात नेण्यासाठी उत्तम.

सारण कडक असेल तर थोडं तूप घालून मळा.