उकडीचे मोदक

सणाचे पदार्थ · वेळ: १ तास ३० मिनिटे · २१ मोदक

गणपती बाप्पाचा सगळ्यात आवडता नैवेद्य. तांदळाच्या पिठाच्या पातळ, पांढऱ्या पारीत ओल्या नारळाचं आणि गुळाचं सारण भरून वाफवलेले मोदक, आणि वरून तुपाची धार — सुगरणीची खरी परीक्षा!

साहित्य

  • सारणासाठी: ओलं खोबरं (खवलेलं) — २ वाट्या
  • गूळ (किसलेला) — १ वाटी
  • वेलची पूड — १ चमचा
  • खसखस (भाजलेली) — १ चमचा (ऐच्छिक)
  • उकडीसाठी: तांदळाचं बारीक पीठ (आंबेमोहर/बासमती) — २ वाट्या
  • पाणी — २ वाट्या
  • तूप — १ चमचा
  • मीठ — चिमूटभर

कृती

  1. सारण: कढईत खोबरं आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर गूळ वितळेपर्यंत ढवळा. मिश्रण थोडं घट्ट झालं की वेलची आणि खसखस घालून गॅस बंद करा. फार कोरडं करू नका.
  2. उकड: पातेल्यात पाणी, तूप आणि मीठ घालून उकळी आणा. आच मंद करून तांदळाचं पीठ एकदम घाला आणि उलथण्याच्या मागच्या बाजूने भराभर ढवळा.
  3. झाकण ठेवून दोन-तीन मिनिटं वाफ येऊ द्या, मग गॅस बंद करून पाच मिनिटं झाकून ठेवा.
  4. उकड परातीत काढून गरम असतानाच, हाताला पाणी-तूप लावत, अगदी मऊ आणि गुळगुळीत मळा.
  5. लिंबाएवढा गोळा घेऊन तळहातावर वाटीसारखा आकार द्या आणि बोटांनी कडा पातळ करत चिमटीने कळ्या (पाकळ्या) पाडा.
  6. मधोमध सारण भरून सगळ्या कळ्या एकत्र आणा आणि वर टोक काढून मोदक बंद करा.
  7. मोदकपात्रात किंवा चाळणीवर केळीचं पान किंवा ओलं कापड ठेवून मोदक मांडा आणि दहा-बारा मिनिटं वाफवा.
  8. मोदक चकचकीत, किंचित पारदर्शक दिसू लागले की तयार. वरून तूप घालून गरम गरम वाढा.

टिपा

उकड मळताना ती थंड होऊ देऊ नका — गरम असतानाच मळली तर पारी फाटत नाही.

कळ्या जितक्या जास्त आणि नीटनेटक्या, तितका मोदक देखणा.

पहिल्यांदा मोदक फुटले तर हरकत नाही — सरावाने सगळं जमतं!