पुरणपोळी

सणाचे पदार्थ · वेळ: २ तास · १२-१५ पोळ्या

महाराष्ट्राचं सणासुदीचं राजस पक्वान्न. होळी, गुढीपाडवा, बैलपोळा — कोणताही मोठा सण पुरणपोळीशिवाय अपूर्ण. मऊसूत कणिकेत गोड पुरण भरून लाटलेली आणि तुपावर भाजलेली पोळी, सोबत कटाची आमटी आणि वरून साजूक तुपाची धार!

साहित्य

  • हरभरा डाळ — २ वाट्या
  • गूळ (किसलेला) — २ वाट्या
  • वेलची पूड — १ चमचा
  • जायफळ पूड — चिमूटभर
  • कणीक (गव्हाचं पीठ) — २ वाट्या
  • मैदा — अर्धी वाटी (ऐच्छिक, पोळी पातळ लाटायला मदत होते)
  • तेल — ४-५ चमचे
  • हळद — पाव चमचा
  • मीठ — चिमूटभर
  • तूप — भाजताना आणि वाढताना

कृती

  1. हरभरा डाळ धुवून तासभर भिजत ठेवा. मग भरपूर पाणी घालून कुकरमध्ये चार-पाच शिट्ट्या करून अगदी मऊ शिजवा.
  2. डाळ चाळणीत ओतून पाणी वेगळं काढा — हे पाणी 'कट' आहे, कटाच्या आमटीसाठी जपून ठेवा.
  3. शिजलेली डाळ जाड बुडाच्या पातेल्यात घेऊन त्यात गूळ घाला. मंद आचेवर सतत ढवळत शिजवा. सुरुवातीला गूळ वितळून मिश्रण पातळ होईल, मग हळूहळू घट्ट होईल.
  4. मिश्रणात उलथनं उभं राहिलं आणि ते पातेल्याच्या कडा सोडू लागलं की पुरण तयार. वेलची-जायफळ पूड घालून गॅस बंद करा.
  5. गरम पुरण पुरणयंत्रातून किंवा चाळणीतून वाटून घ्या, म्हणजे एकही कण न राहता अगदी मऊ होईल. थंड होऊ द्या.
  6. कणीक, मैदा, हळद, मीठ एकत्र करून पाण्याने अगदी सैलसर, मऊ भिजवा. वरून तेल लावून तासभर झाकून ठेवा, मधून मधून तेल लावून मळत राहा.
  7. कणकेचा लिंबाएवढा गोळा घेऊन पुरीसारखा लाटा, त्यात दुप्पट पुरणाचा गोळा भरून कडा एकत्र करून बंद करा.
  8. तांदळाची पिठी लावून हलक्या हाताने पातळ पोळी लाटा. पुरण कडेपर्यंत पसरलं पाहिजे.
  9. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी तूप सोडत खरपूस भाजा.

टिपा

पुरण नीट शिजलं नाही तर पोळी लाटताना फाटते — उलथनं उभं राहणं हीच खूण.

कणीक जितकी सैल, तितकी पोळी मऊ.

पुरणपोळी दुधासोबत, तुपासोबत किंवा कटाच्या आमटीसोबत खातात — प्रत्येक घराचा वेगळा पक्ष!