साबुदाणा खिचडी

उपवास · वेळ: २० मिनिटे (+ ६ तास भिजवणे) · ३ जण

उपवासाचा राजा! मोकळे, मऊ साबुदाणे, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, जिरं, मिरची आणि बटाटा. एकादशी, महाशिवरात्री, नवरात्र — कोणत्याही उपवासाची जान.

साहित्य

  • साबुदाणा — २ वाट्या
  • शेंगदाण्याचं कूट (भाजून भरडलेले) — पाऊण वाटी
  • बटाटा — १ (उकडून किंवा कच्चा चौकोनी)
  • हिरव्या मिरच्या — ३
  • जिरं — १ चमचा
  • तूप किंवा तेल — ३ चमचे
  • साखर — १ चमचा
  • सैंधव किंवा मीठ — चवीनुसार
  • लिंबू, कोथिंबीर

कृती

  1. साबुदाणा दोन-तीन वेळा धुवा, आणि साबुदाणा जेमतेम बुडेल इतकं पाणी ठेवून सहा तास किंवा रात्रभर भिजवा.
  2. भिजलेला साबुदाणा दाबून पाहा — मधोमध पांढरा टणक कण नसेल तर तो तयार. त्यात शेंगदाण्याचं कूट, मीठ, साखर मिसळा.
  3. कढईत तूप गरम करून जिरं आणि मिरच्या घाला. बटाटा घालून मऊ होईपर्यंत परता.
  4. साबुदाण्याचं मिश्रण घालून हलक्या हाताने परता. झाकण ठेवून मंद आचेवर पाच मिनिटं वाफवा, मधून मधून ढवळा.
  5. साबुदाणे पारदर्शक झाले की लिंबू पिळून, कोथिंबीर घालून दह्यासोबत वाढा.

टिपा

जास्त पाणी घातलं तर साबुदाणा चिकट होतो — 'जेमतेम बुडेल' हा नियम पाळा.

शेंगदाण्याचं कूट साबुदाण्यात आधी मिसळलं की खिचडी मोकळी होते.