शंकरपाळे

फराळ · वेळ: ४५ मिनिटे · मोठा डबा

चौकोनी, खुसखुशीत, किंचित गोड शंकरपाळे — दिवाळीचा असा फराळ जो डब्यातून सगळ्यात आधी संपतो!

साहित्य

  • मैदा — ३ वाट्या
  • साखर — पाऊण वाटी
  • दूध — पाऊण वाटी
  • तूप — अर्धी वाटी
  • मीठ — चिमूटभर
  • तळण्यासाठी तेल

कृती

  1. पातेल्यात दूध, साखर आणि तूप एकत्र करून साखर विरघळेपर्यंत गरम करा. उकळू देऊ नका.
  2. मिश्रण कोमट झाल्यावर त्यात मीठ आणि मावेल तितका मैदा घालून घट्ट पीठ मळा. अर्धा तास झाकून ठेवा.
  3. पिठाचा मोठा गोळा जाडसर पोळीसारखा लाटा आणि कातणाने किंवा सुरीने चौकोनी तुकडे कापा.
  4. मध्यम-मंद आचेवर तेलात हलके सोनेरी होईपर्यंत तळा.
  5. पूर्ण थंड झाल्यावर डब्यात भरा.

टिपा

तिखट-मीठ आणि ओवा घालून 'खारे शंकरपाळे'ही करता येतात.

मंद आचेवर तळले तरच आतपर्यंत खुसखुशीत होतात.