श्रीखंड

गोड · वेळ: १० मिनिटे (+ ६ तास चक्का) · ४-५ जण

दह्याचा घट्ट चक्का, साखर, वेलची आणि केशर — सोपं, थंडगार आणि राजस. गुढीपाडव्याला श्रीखंड-पुरी हा अनेक घरांचा ठरलेला बेत.

साहित्य

  • घट्ट दही — १ लिटर दुधाचं (साधारण ४ वाट्या)
  • पिठीसाखर — पाऊण ते १ वाटी
  • वेलची पूड — १ चमचा
  • केशर — चिमूटभर (२ चमचे कोमट दुधात भिजवलेलं)
  • चारोळी, बदाम-पिस्ता काप — सजावटीसाठी

कृती

  1. दही स्वच्छ सुती कापडात बांधून टांगून ठेवा, किंवा चाळणीवर कापड ठेवून त्यात दही घालून फ्रीजमध्ये पाच-सहा तास ठेवा, म्हणजे सगळं पाणी निथळेल. उरलेला घट्ट गोळा म्हणजे चक्का.
  2. चक्का आणि पिठीसाखर एकत्र करून पुरणयंत्रातून किंवा बारीक चाळणीतून घोटून घ्या, म्हणजे एकही गुठळी राहणार नाही.
  3. वेलची पूड आणि केशराचं दूध घालून नीट मिसळा.
  4. वरून चारोळी आणि सुकामेवा घालून फ्रीजमध्ये थंड करा.

टिपा

दही फार आंबट असेल तर साखर थोडी जास्त लागते.

आंब्याचा रस घातला की होतं आम्रखंड!