थालीपीठ

नाश्ता · वेळ: ३० मिनिटे · ४ थालीपीठं

भाजणीच्या खमंग पिठाचं, कांदा-कोथिंबीर घातलेलं, मधोमध भोकं पाडून तेलावर खरपूस भाजलेलं थालीपीठ — वर लोण्याचा गोळा किंवा सोबत दही.

साहित्य

  • भाजणीचं पीठ — २ वाट्या (ज्वारी, बाजरी, तांदूळ, हरभरा डाळ, उडीद डाळ, धणे-जिरं भाजून दळलेलं)
  • कांदा — १ मोठा (बारीक चिरलेला)
  • कोथिंबीर — अर्धी वाटी
  • लाल तिखट — १ चमचा
  • हळद — अर्धा चमचा
  • तीळ — १ चमचा
  • मीठ — चवीनुसार
  • तेल — भाजण्यासाठी
  • लोणी किंवा दही — वाढण्यासाठी

कृती

  1. भाजणीच्या पिठात कांदा, कोथिंबीर, तिखट, हळद, तीळ आणि मीठ घाला.
  2. थोडं थोडं पाणी घालत मऊसर पीठ मळा.
  3. प्लास्टिकच्या कागदावर किंवा ओल्या कापडावर पिठाचा गोळा ठेवून बोटांनी थापून गोल थालीपीठ करा. मधोमध आणि भोवती चार-पाच भोकं पाडा.
  4. गरम तव्यावर थालीपीठ उलटं टाका, भोकांत आणि कडेने तेल सोडा.
  5. झाकण ठेवून मंद आचेवर एक बाजू खरपूस झाली की उलटून दुसरी बाजू भाजा.
  6. गरम थालीपीठावर लोण्याचा गोळा ठेवून वाढा.

टिपा

भोकं पाडल्याने थालीपीठ आतपर्यंत नीट भाजतं.

उरलेली भाजी, किसलेली काकडी किंवा पालक घालूनही थालीपीठ करता येतं.