संत गाडगे महाराज

१८७६ – १९५६ · शेणगाव (अमरावती)

हातात खराटा, अंगावर चिंध्यांची गोधडी आणि डोक्यावर फुटकं मडकं — गावोगावी झाडू मारून स्वच्छता, शिक्षण आणि माणुसकीचा संदेश देणारे कीर्तनकार.

देबूजी ते गाडगेबाबा

मूळ नाव देबूजी झिंगराजी जानोरकर. अमरावती जिल्ह्यातल्या शेणगावचे, परीट समाजातले. घरची गरिबी आणि सावकारी पाश त्यांनी लहानपणीच अनुभवले.

तरुणपणी घर सोडलं आणि आयुष्यभर फिरस्ती केली. डोक्यावरचं फुटकं गाडगं (मडकं) हेच भांडं — म्हणून लोक त्यांना 'गाडगेबाबा' म्हणू लागले.

आधी झाडू, मग कीर्तन

गावात शिरले की गाडगेबाबा आधी खराटा घेऊन रस्ते, गल्ल्या झाडायचे. लोक जमायचे, लाजायचे, मदतीला यायचे. संध्याकाळी त्याच गावात कीर्तन — अंधश्रद्धा, पशुबळी, दारू, देवाच्या नावाने होणारी लूट यावर ते लोकांना प्रश्न विचारत.

देवळापेक्षा शाळा, धर्मशाळा, अनाथालय आणि गरिबांसाठी अन्नछत्र उभारा, असं ते सांगत. पंढरपूर, नाशिक, आळंदी अशा ठिकाणी त्यांनी लोकवर्गणीतून धर्मशाळा उभारल्या.

दशसूत्री — आजही लागू

भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, उघड्याला वस्त्र, गरीब मुलांना शिक्षण, बेघराला निवारा, अंध-अपंग-रोग्यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींच्या लग्नाला मदत, आणि दुःखी-निराशांना हिंमत — हीच खरी भक्ती, असं ते सांगत.

महाराष्ट्र शासनाने २००० सालापासून त्यांच्या नावाने 'संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान' सुरू केलं, आणि अमरावती विद्यापीठालाही त्यांचं नाव दिलं.

त्यांचं लाडकं भजन

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला

प्रमुख रचना

कीर्तनं, 'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' भजन, दशसूत्री