ओवाळू आरती मदनगोपाळा

श्रीकृष्ण · रचना: संत एकनाथ

चरणकमल ज्याचे अतिसुकुमार।
ध्वजवज्रांकुश ब्रीदाचा तोडर॥

ओवाळू आरती मदनगोपाळा।
श्यामसुंदर गळां वैजयंती माळा॥

नाभिकमळ ज्याचे ब्रह्मयाचे स्थान।
हृदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन॥

मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी।
वेधलें मानस हारपली दृष्टी॥

जडितमुगुट ज्याचा दैदीप्यमान।
तेणें तेजें कोंदलें अवघें त्रिभुवन॥

एका जनार्दनीं देखियेलें रूप।
रूप पाहों जातां झालें तद्रूप॥

केव्हा म्हणतात

गोकुळाष्टमी, कृष्णाची पूजा

श्रीकृष्णाच्या रूपाचं पायापासून मुकुटापर्यंत वर्णन — आणि ते रूप पाहता पाहता भक्त तद्रूप होतो.