नाना परिमळ दूर्वा

गणपती · रचना: गोसावीनंदन

नाना परिमळ दूर्वा शेंदुर शमिपत्रें।
लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रें।
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रें।
अष्टहि सिद्धि नवनिधि देसी क्षणमात्रें॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती॥

तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती।
त्यांची सकलहि पापे विघ्नेंही हरती।
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती।
सर्वहि पावुनि अंती भवसागर तरती॥

शरणागत सर्वस्वें भजती तव चरणी।
कीर्ति तयांची राहे जोंवर शशितरणी।
त्रैलोक्यी ते विजयी अद्भुत हे करणी।
गोसावीनंदन रत तव नामस्मरणी॥

केव्हा म्हणतात

गणेशोत्सव — 'सुखकर्ता'नंतर

गणपतीच्या पूजेत अर्पण केल्या जाणाऱ्या दूर्वा, शेंदूर, शमीपत्र, मोदक यांचं वर्णन करणारी आरती.