त्रिगुणात्मक त्रैमूर्ती

दत्त · रचना: संत एकनाथ

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा।
नेती नेती शब्द न ये अनुमाना।
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना॥

जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता।
आरती ओवाळिता हरली भवचिंता॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त।
अभाग्यासी कैची कळेल ही मात।
पराही परतली तेथे कैचा हा हेत।
जन्ममरणाचा पुरलासे अंत॥

दत्त येऊनिया उभा ठाकला।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला।
जन्ममरणाचा फेरा चुकविला॥

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान।
हरपले मन झाले उन्मन।
मीतूपणाची झाली बोळवण।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान॥

केव्हा म्हणतात

दत्त जयंती, गुरुवार, गुरुपौर्णिमा

ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं एकत्र रूप असलेल्या श्रीदत्तांची आरती. शेवटी 'एका जनार्दनी' ही एकनाथांची नाममुद्रा.