युगे अठ्ठावीस विटेवरी उभा

विठ्ठल · रचना: संत नामदेव

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा॥

जय देव जय देव जय पांडुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा॥

तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी।
कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी।
देव सुरवर नित्य येती भेटी।
गरुड हनुमंत पुढे उभे राहती॥

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा।
राही रखुमाबाई राणीया सकळा।
ओवाळिती राजा विठोबा सावळा॥

ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती।
दिंड्या पताका वैष्णव नाचती।
पंढरीचा महिमा वर्णावा किती॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती।
चंद्रभागेमाजी स्नाने जे करिती।
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती।
केशवासी नामदेव भावे ओवाळिती॥

केव्हा म्हणतात

आषाढी-कार्तिकी एकादशी, वारी, रोजची पूजा

पुंडलिकाच्या भेटीसाठी अठ्ठावीस युगं विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाची आरती — वारकरी परंपरेचं हृदय.