बडबड्या कासव

पंचतंत्र · वयोगट: ४ ते ९ वर्षं

एका तलावात एक कासव राहत होतं. त्याचे दोन हंस मित्र होते. एकदा दुष्काळ पडला आणि तलाव आटू लागला. हंस म्हणाले, 'आम्ही दूरच्या मोठ्या तलावात जाणार. तू कसा येणार?'

कासवाने युक्ती सुचवली — 'तुम्ही दोघं एका काठीची दोन टोकं चोचीत धरा, मी मधोमध तोंडाने काठी पकडतो.' हंस म्हणाले, 'ठीक आहे, पण वाटेत अजिबात तोंड उघडायचं नाही!' कासव 'हो' म्हणालं.

हंस उडाले. खाली गावातल्या लोकांनी हे अजब दृश्य पाहिलं आणि ओरडू लागले, 'अरे, हंस कासवाला घेऊन चाललेत!' कासवाला राहवलं नाही. 'तुम्हाला काय करायचंय?' म्हणायला त्याने तोंड उघडलं — आणि धपकन खाली पडलं.

तात्पर्य: योग्य वेळी गप्प बसणं हेही शहाणपण आहे. उगाच बडबड केली की नुकसान होतं.