एकीचे बळ

इसापनीती · वयोगट: ५ ते १० वर्षं

एका शेतकऱ्याला चार मुलगे होते. ते सतत एकमेकांशी भांडायचे. शेतकरी म्हातारा झाला तसा त्याला काळजी वाटू लागली — आपल्या मागे यांचं कसं होणार?

एके दिवशी त्याने चौघांना बोलावलं आणि काड्यांची एक मोळी आणायला सांगितली. 'ही मोळी तोडून दाखवा.' प्रत्येकाने जोर लावला, पण मोळी तुटली नाही.

मग त्याने मोळी सोडली आणि प्रत्येकाला एकेक काडी दिली. 'आता तोडा.' काड्या कट्कन तुटल्या. शेतकरी म्हणाला, 'तुम्ही एकत्र राहिलात तर या मोळीसारखे मजबूत राहाल. वेगळे झालात तर कोणीही तुम्हाला मोडेल.' मुलांना पटलं.

तात्पर्य: एकीत बळ आहे. एकत्र राहिलं तर कोणतंही संकट हरवता येतं.