खारीचा वाटा

रामायणाशी जोडलेली लोककथा · वयोगट: ४ ते १० वर्षं

सीतेला परत आणण्यासाठी श्रीरामांची वानरसेना समुद्रावर सेतू बांधत होती. नल आणि नील मोठमोठे दगड रचत होते, हनुमान आणि इतर वानर डोंगरच्या डोंगर उचलून आणत होते. सगळीकडे नुसती धावपळ चालली होती.

त्या गर्दीत एक छोटी खार होती. ती समुद्राच्या पाण्यात अंग भिजवायची, मग किनाऱ्यावरच्या वाळूत लोळायची आणि अंगाला चिकटलेली वाळू दगडांच्या फटींत झटकून यायची. पुन्हा पाणी, पुन्हा वाळू — दिवसभर हेच. एका वानराने हसून विचारलं, 'एवढ्याशा वाळूने काय होणार?'

श्रीरामांनी हे पाहिलं. त्यांनी खारीला हळूच हातात घेतलं आणि म्हणाले, 'मोठे दगड रचले जातात, पण त्यांच्यातल्या फटी भरून काढणारी ही वाळूच सेतू पक्का करते. हिचं काम कोणापेक्षाही कमी नाही.' आणि प्रेमाने तिच्या पाठीवरून बोटं फिरवली. म्हणतात, खारीच्या पाठीवरचे पट्टे म्हणजे त्याच बोटांच्या खुणा. म्हणूनच आपण छोट्याशा मदतीला 'खारीचा वाटा' म्हणतो.

तात्पर्य: मदत छोटी असली तरी मनापासून केली, तर तिचं मोल मोठं असतं.