लांडगा आला रे आला

इसापनीती · वयोगट: ३ ते ८ वर्षं

एक मुलगा डोंगरावर मेंढ्या चारायचा. एके दिवशी त्याला गंमत करावीशी वाटली. तो जोरात ओरडला, 'लांडगा आला रे आला!' गावकरी काठ्या घेऊन धावत आले — पण तिथे लांडगा नव्हताच. मुलगा खूप हसला.

दोन दिवसांनी त्याने पुन्हा तीच गंमत केली. गावकरी पुन्हा धावत आले आणि पुन्हा फसले. ते रागावून परत गेले.

एके दिवशी खरंच लांडगा आला. मुलगा जिवाच्या आकांताने ओरडला, 'लांडगा आला रे आला!' पण आता कोणीही आलं नाही. लांडग्याने मेंढ्यांची नासाडी केली.

तात्पर्य: खोटं बोलणाऱ्यावर, तो खरं बोलला तरी, कोणी विश्वास ठेवत नाही.