पुंडलिकाची मातृपितृभक्ती

पंढरपूरची लोककथा · वयोगट: ५ ते १० वर्षं

पंढरपुरात पुंडलिक नावाचा मुलगा राहायचा. एकेकाळी तो आई-वडिलांकडे दुर्लक्ष करायचा, पण पुढे त्याला आपली चूक कळली आणि तो मनापासून त्यांची सेवा करू लागला.

एके दिवशी पुंडलिक आई-वडिलांचे पाय दाबत होता, तेव्हा प्रत्यक्ष श्रीकृष्ण — विठ्ठल — त्याच्या दारी आले. 'पुंडलिका, मी तुला भेटायला आलोय!'

पुंडलिक म्हणाला, 'देवा, आई-वडिलांची सेवा अर्धवट सोडून कसा येऊ? ही वीट घ्या, तिच्यावर उभे राहा, मी आलोच.' आणि त्याने एक वीट देवाकडे फेकली.

भक्ताची ही सेवा पाहून विठ्ठल प्रसन्न झाले आणि कमरेवर हात ठेवून त्या विटेवर उभे राहिले — आजही पंढरपुरात ते तसेच उभे आहेत.

तात्पर्य: आई-वडिलांची सेवा हीच देवाची खरी पूजा.