सिंह आणि उंदीर

इसापनीती · वयोगट: ३ ते ८ वर्षं

एक सिंह झाडाखाली झोपला होता. एक छोटा उंदीर खेळता खेळता त्याच्या अंगावर चढला. सिंह जागा झाला आणि त्याने उंदराला पंजात पकडलं. उंदीर गयावया करू लागला, 'महाराज, मला सोडा. कधीतरी मीही तुमच्या उपयोगी पडेन.'

सिंह हसला — 'एवढासा तू, माझ्या काय उपयोगी पडणार?' पण त्याला दया आली आणि त्याने उंदराला सोडून दिलं.

काही दिवसांनी सिंह शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला. त्याने खूप डरकाळ्या फोडल्या, पण जाळं तुटेना. त्याचा आवाज ऐकून उंदीर धावत आला आणि आपल्या धारदार दातांनी जाळं कुरतडून टाकलं. सिंह मुक्त झाला.

तात्पर्य: कोणालाही लहान समजू नये. केलेला उपकार कधी ना कधी परत येतो.