टोपीवाला आणि माकडं

लोककथा · वयोगट: ३ ते ८ वर्षं

एक टोपीवाला गावोगावी टोप्या विकायचा. एका दुपारी तो दमून झाडाखाली टोप्यांचं गाठोडं ठेवून झोपला.

जागा झाला तर काय — गाठोडं रिकामं! वर पाहिलं तर झाडावरच्या सगळ्या माकडांनी एकेक टोपी डोक्यावर घातली होती.

टोपीवाल्याने रागाने मुठ आवळली — माकडांनीही आवळली. त्याने डोकं खाजवलं — माकडांनीही खाजवलं. त्याच्या लक्षात आलं, माकडं आपली नक्कल करतात!

त्याने आपली टोपी काढून जमिनीवर फेकली. लगेच सगळ्या माकडांनीही आपापल्या टोप्या खाली फेकल्या. टोपीवाल्याने त्या गोळा केल्या आणि हसत पुढे निघाला.

तात्पर्य: संकटात घाबरण्यापेक्षा शांत डोक्याने विचार केला तर उपाय सापडतो.